Rajhans Prakahsan Logo राजहंस प्रकाशन

YouTube व्हिडिओ

23. चंद्रकांत कुलकर्णी सादर करीत आहे...| Director Chandrakant Kulkarni

कवीनं असावं अल्पाक्षरी, आणि नाटककारानं मितभाषी. अभिनेत्यानं करावा संहितेतील अव्यक्त आशय व्यक्त. तंत्रज्ञानं साधावा शब्देविण संवाद. ध्वनी, प्रकाश, रंग, रेषा यांनी टाकावा अवकाश भारून. प्रेक्षकांनी सगळं अनुभवावं, मूक राहून आणि एकाग्र होऊन. समीक्षकांनी करावं नाट्यानुभवाचं विश्लेषण अचूक. पण मग,... दिग्दर्शकानं काय करावं? सांगत आहेत, मराठी नाट्यसृष्टीतील अग्रणी दिग्दर्शक आणि अभिनेते- चंद्रकांत कुलकर्णी.

22. द सिक्रेट मिशन: एका अद्भुत रहस्याच्या मागावर...

मराठी साहित्यात रहस्य कथांचा वाचकवर्ग खूप मोठा आहे. आजही रहस्यकथा मोठ्या आवडीनं वाचल्या जातात. रहस्य कथाकार बाबुराव अर्नाळकर आणि गुरूनाथ नाईक यांच्या सन्मानार्थ राजहंस प्रकाशनानं घेतलेल्या रहस्य सन्मान कादंबरी स्पर्धेतली द्वितीय क्रमांक विजेती कादंबरी म्हणजे 'द सिक्रेट मिशन'. या अनोख्या कादंबरीविषयी चर्चा करूया या भागात.

21. चंद्रशेखर: जसं जगलो तसं | Chandrashekhar

१९९० च्या दशकात वेगवेगळ्या सामाजिक प्रश्नांनी आणि सीमा प्रश्नांनीही देश धुमसत असताना १० नोव्हेंबर १९९० रोजी चंद्रशेखर यांनी देशाचे आठवे पंतप्रधान म्हणून सूत्रे हाती घेतली. चंद्रशेखर यांच्याविषयी आजच्या पिढीला विशेष माहिती नाही. समाजवादी विचारसरणीच्या मुशीत घडलेल्या, आणीबाणीत तुरुंगवास भोगलेल्या आणि १९८३ साली भारत यात्रेद्वारे देश पिंजून काढलेल्या चंद्रशेखर यांनी ‘जीवन जैसे जिया’ या आपल्या आत्मचरित्रात आपला जीवनप्रवास उलगडला आहे. जसं जगलो तसं… या नावानं या चरित्राचा मराठी अनुवाद केलाय लेखक-ज्येष्ठ पत्रकार अंबरीश मिश्र यांनी. याविषयी जाणून घेऊया या एपिसोडमध्ये.

20. | ज्याचं त्याचं एव्हरेस्ट | सत्यघटनेवर आधारित अद्भुत कादंबरी

हिमालय अनेकांना वेड लावतो. का? कसं? एव्हरेस्टसारखं अत्युच्च शिखर सर केल्यानंतरही गिर्यारोहकांची पावलं पुन:पुन्हा हिमालयाकडे का वळतात? पर्वतराजीतील भव्यता आणि शांतता, रौद्रता आणि सात्त्विकता त्यांना भुरळ पाडत असते? की निसर्गाचा लहरीपणा त्यांच्यातील धाडसी आणि अपराजित वृत्तीला सतत आव्हान देत असतो? अशावेळी त्यांचे प्रियजन कशी साथ देत असतील? एव्हरेस्ट शिखर सर करण्याच्या अनावर ओढीपायी तीन पिढ्यांमध्ये निर्माण झालेले ताणतणाव, संघर्ष आणि परस्परांना समजून घेण्याचे प्रयास चित्रित करणारी - ‘सत्य हे कल्पनेपेक्षा अद्भुत असतं’ याचा प्रत्यय देणारी - सत्यघटनेवर आधारित कादंबरी!

19. समृद्ध, भावसंपन्न गोंदणखुणा

एखाद्या संवेदनशील स्त्रीनं आपल्या जाणत्या सखीला कधी मनोगत तर कधी हृद्गत सांगावं, तसा या 'गोंदणखुणा' - चा आशय आहे. निसर्गातील एखाद्या घटकाचा अनपेक्षित साक्षात्कार, मानवी स्वभावातील अतर्क्य भावनाट्य, रुणझुणत्या कवितेच्या चरणाशी सहज घडलेला अर्थमेळ, स्त्री-संवेदनेशी जोडलेल्या घटना-प्रसंगांची चलतचित्र किंवा जीवनाच्या एखाद्या प्राणसूत्राचं स्वतःला निःसंदर्भ करून केलेलं आत्मचिंतन - अशा अनेक आशयसूत्रांची स्मरणी या लेख- संग्रहात आहे.